Monday, December 28, 2015

प्रतिबिंब

हे तुझे माझ्यात भिनणे…
कि माझे तुझ्यात विरघळणे
मग…सहज म्हणून तुला वजा करून बघितले
तर...तर आरशाने माझे प्रतिबिंबच नाकारले.....

Sunday, November 22, 2015

मैत्री


आम्ही रोज भेटायचो नाहीच जमले तर बोलायचो तेही अगदी मनाच्या तळापर्यंत पोहोचेपर्यंत, सगळे नितळ स्वच्छ दिसेपर्यंत...भरलेले आभाळ कोसळून पाण्याचा निचरा होईपर्यंत आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंग डोळ्यांचे पारणे फिटवेपर्यंत…

आम्हाला वेळेचे मुळी भानच नसायचे. रोजचा नवीन दिवस, नव्या गुजगोष्टी.. कधी तलत , मन्ना डे , गुलाम अली तर कधी शमशाद बेगम अन सुर्रेया... सारे भेटीसाठी कायमच हजर असायचे… नवीन काहीतरी वाचलेले,  नवीन कधी सुचलेले एकमेकांना कधी किती सांगू, किती बोलू आणि किती नको असे होऊन जायचे... कितीही वेळ गेला तरी आमची द्रोपदीची थाळी सदा न कदा भरलेली !! कधी नवे रंग, नवे बंध तर कधी आंतरिक नातेसंबंध....... आणि या मनमुराद गप्पानंतर सारे कसे अगदी स्वच्छ - शांत, भर उन्हात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीसारखे, दिलासा देणारे, मरगळ घालवणारे आणि प्रफुल्लित करणारे… नव्या सुर्योदयाची नव्याने सुरुवात करून देणारे अन नवरंग फुलवणारे....

मात्र हळूहळू सगळे बदलत गेले, तसे विशेष असे काही घडले नाही पण विनाभेटीचे दिवस विनासायास सरू लागले…ओठापर्यंत काहीच पोहोचेनासे झाले , फोन ची जागा sms ने घेतली आणि sms ची जागा e -mail, पुढे पुढे तर ते हि बंद झाले. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली पण पावसाच्या सरीची चाहूलही लागेनाशी झाली. मन्ना डे च्या ऐवजी मुकेश भेटीला येऊ लागला. मनातल्या गुजगोष्टींची जागा मनातले सल घेऊ लागले. कालांतराने ते सल हि सरले अन आठवणीच काय त्या उरल्या , ज्या अजूनही कधी गरम कढ तर कधी सुखद गारवा घेऊन भेटीला येतात. पण हो, त्यालाही जुन्या गर्भरेशमी पैठणीतील नाचर्या मोरांची वेलबुट्टी आहे आणि त्यांना मी अजूनही अलगद मोरपिसागत जपून ठेवले आहे.....

मंद सुवासिक अत्तराच्या कुपीतील अत्तर तर उडून गेले आहे, पण ती रिकामी अत्तराची कुपी मी घट्ट बंद करून अजूनही शिसवी कपाटाच्या कुलूपबंद खणात जपून ठेवली आहे . जेंव्हा कधी फार उदास एकटे एकाकी वाटते तेंव्हा मी हळूच कुणी आजूबाजूला नाहीये हे बघून ती अत्तराची कुपी उघडते . उरलेला हलका हलका मंद सुगंध श्वासभरून घेते आणि चटकन बंद करते वर्षानुवर्ष तो असाच जतन करण्यासाठी आणि पुरवून पुरवून वापरण्यासाठी :)

शिल्पा   

Friday, November 20, 2015

मित्र

मित्र

माझा मित्र फक्त मीच बनावे

मनातले सगळे सल सांगायला
आणि ते अगदी तसेच्या तसे समजून घ्यायला
कायम मला अभिप्रेत असलेलाच अर्थ लावायला

नवीन तीरपांगडे विचार जोजवायाला 
कधीच मी चुकतोय असे न सांगायला
आणि प्रत्येकच गोष्टीवर गुमान मान डोलवायला

माझे तिरकस अतिरेकी तोडगे सरळपणे मानायला
माझ्याशी मनमुराद गप्पा मारायला 
आणि माझ्याच कानांनी माझे बोलणे ऐकायला !!


Tuesday, November 17, 2015

बहर

आपण कितीही आपले weather बरोबर घेऊन फिरलो तरी ते सोनेरी, चंदेरी दिवस त्या त्या गोष्टींची परत परत आठवण करून देतातच…दोन वर्षापूर्वी याच दिवसांत... तीच पानगळ , तोच पिवळेधमक सडा आणि तीच कविता !!

सोनेरी किरणांची झालर लेवून
तू माझ्या खिडकीतून डोकावत होतास
कोजागिरीच्या चांदण्यात
मला नाहून टाकत होतास

घट्ट मिटत्या काळोखात
छटा माझ्या आजमावत होतास
तुझे चित्र साकारण्यात
दिवस माझा सरत होता

रोज निराळ्या पिवळ्या रंगाचा
रंग मला उमगत होता
तरीही माझ्या पटावर तू
काही केल्या उमटत नव्हतास

कारण…. बहुदा…
शरदातील त्या पानगळीचा
मला कधीच अडसर नव्हता
माझ्या दारच्या पळसाला
सतत तोच बहर होता…

शिल्पा


Wednesday, May 13, 2015

vibgyor अर्थात सप्तरंग.

रंगांचे वेड मला लहानपणापासूनच होते, रंगांशी खेळत राहणे, काहीही वेडेवाकडे काढत राहणे मला आवडे. मोर काढून त्यात रंग भरणे हा माझा फावल्या वेळातील आवडता उद्योग होता तेंव्हा , इतके कि कित्येकदा आमची रांगोळी भरपूर रंग भरलेल्या पिसारा फुलवलेल्या सुंदर मोराचीच किंवा फार फार तर रंग-बिरंगी फुलपाखराची असायची, बहुदा त्या मोराचे पाय दिसत नसत तेंव्हा.…मन अगदी फुलपाखरासारखेच स्वच्छंदी होते बहुदा. त्यावेळच्या कल्पना त्या वयाला अनुसरूनच असाव्यात. त्यावेळेस फक्त bright colours आवडत, दिसत. तांबड्या , हिरव्या रंगांपलीकडे जग दिसतच नव्हते. कोणत्याही dull कलर चा तर दुरदुरपर्यंत पण संबंध नव्हता.

जसे जसे वय वाढत गेले तसे मात्र प्रत्येक कलरचा शिरकाव होऊ लागला आयुष्यात . जसे रंग दिसत गेले तसे आपोआपच आपलेसे करत गेले , त्यांना तसे आपलेसे करण्याशिवाय पर्यायच नव्हता. रंगांची पुर्णपणे ओळखही नव्हती तेंव्हा. आजूबाजूला अचानक दिसणारे नवनवीन, हिरवे पिवळे निळे अपरिचित रंग आणि त्यांच्या असंख्य छटा मनाचा गोंधळ उडवून टाकत होते. काही तर वर-वरून एकसारखे दिसत मात्र आतून एकदमच अजब त्यांना ओळखणे handle करणे जड जात होते. हि मोठी जोखीमच होती.

आता काही ठोकताळे बांधणे, अभ्यास करणे आणि थोड्या तरी झेपेल तश्या अभ्यास पूर्ण steps घेणे जरुरी होते. कालांतराने ते थोडे फार जमू लागले. टप्प्या टप्प्याने मजल गाठत आता गोष्टी थोड्या आवाक्यात आल्या होत्या. मग हळहळू प्रत्येक रंगांची एक एक छटा, त्याची पोत आणि गुणधर्म नव्याने समजून घेण्याचा प्रयास करू लागले. हे सगळे जवळून बघणे हा एक अनुभव नवीन होता खरा पण आता हे सगळेच उमगू लागले होते, त्यांचे नवीन अर्थ आता उलगडू लागले होते पण हे सगळे वाटते तितके सरळ सोपे चुटकीसरशी जमणारे नव्हते. प्रत्येक रंगांची quality, गहराई , consistency ओळखत त्यांना चुचकारत आपलेसे करणे भाग होते . एकत्र झालेल्या प्रत्येक रंगालाही मग हळुवार वेगळे करत त्याचे निकष ठरवत गेले, त्यात बराच काळ गेला.

आज हि पुरती ओळख पटली आहे असे म्हणणे नक्कीच योग्य ठरणार नाही ओळख पुरेशी पटलेली नाहीच पण आता अगदी सैरभैर अवस्था तरी होत नाही. अजूनही कधी मधी ग्रे कलर कॅनव्हास वर वाजवीपेक्षा अंमळ जास्तच भरकटतो, त्यावर हमखास असा रामबाण उपाय नसतोच पण फार काळ त्याला जवळ राहू देणे इष्ट नाही हे जाणते आणि त्याला कधी कसेबसे कधी प्रयत्नपूर्वक बाहेर काढत जाते. आणि बाकी सप्तरंगाना जवळ करत … त्यातही माझ्या आवडीच्या आनंदाची उधळण करणाऱ्या केशरी रंगाला , समतोल साधणाऱ्या निळ्या रंगाला , सर्वाना सामावून घेऊन पुढे जाऊ पाहणाऱ्या गर्द हिरव्या रंगाला, स्वतंत्र निश्चयी वृत्तीच्या काळ्या कुळकुळीत रंगाला आणि आसपास सतत possitive energy पसरवत प्रेरणा देणाऱ्या लाल भडक रंगाला जास्त प्राधान्य देत राहते .

अर्थात आजही माझ्या प्रत्येक art मध्ये मला ग्रे ची ती छटा सतत दिसतेच , आणि त्याचे तसे अस्तित्व मी मान्यच केले आहे, तो कलर सगळा स्मृतीपट माझ्यासमोर उलगडवतो. शिखराकडे बघताना पायथ्यालाही स्मरण्याची जाणीव आणि जगण्याची प्रेरणा तो ग्रे रंग पदोपदी देत असतो. कोणत्या रंगांशी किती जवळीक साधायची याचे तो सतत भान करून देतो आणि मला सतत काहीतरी चांगले करण्यासाठी उद्युक्तहि ठेवतो . त्याच्याशिवाय माझे सगळे आवडते रंगही अधुरे आहेत म्हणूनच माझ्या सप्तरंगात त्या करड्या रंगालाही तितकेच महत्वाचे स्थान आहे.

शेवटी त्या इंद्रधनुष्याचे सप्तरंग त्या काळ्या ढगातुनच डोकावतात आणि सूर्यप्रकाशाबरोबरच रंगांची चौफेर उधळण दाही दिशांना करतात हे विसरून कसे चालेल.

Shilpa