Sunday, November 22, 2015

मैत्री


आम्ही रोज भेटायचो नाहीच जमले तर बोलायचो तेही अगदी मनाच्या तळापर्यंत पोहोचेपर्यंत, सगळे नितळ स्वच्छ दिसेपर्यंत...भरलेले आभाळ कोसळून पाण्याचा निचरा होईपर्यंत आणि इंद्रधनुष्याचे सप्तरंग डोळ्यांचे पारणे फिटवेपर्यंत…

आम्हाला वेळेचे मुळी भानच नसायचे. रोजचा नवीन दिवस, नव्या गुजगोष्टी.. कधी तलत , मन्ना डे , गुलाम अली तर कधी शमशाद बेगम अन सुर्रेया... सारे भेटीसाठी कायमच हजर असायचे… नवीन काहीतरी वाचलेले,  नवीन कधी सुचलेले एकमेकांना कधी किती सांगू, किती बोलू आणि किती नको असे होऊन जायचे... कितीही वेळ गेला तरी आमची द्रोपदीची थाळी सदा न कदा भरलेली !! कधी नवे रंग, नवे बंध तर कधी आंतरिक नातेसंबंध....... आणि या मनमुराद गप्पानंतर सारे कसे अगदी स्वच्छ - शांत, भर उन्हात नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या सरीसारखे, दिलासा देणारे, मरगळ घालवणारे आणि प्रफुल्लित करणारे… नव्या सुर्योदयाची नव्याने सुरुवात करून देणारे अन नवरंग फुलवणारे....

मात्र हळूहळू सगळे बदलत गेले, तसे विशेष असे काही घडले नाही पण विनाभेटीचे दिवस विनासायास सरू लागले…ओठापर्यंत काहीच पोहोचेनासे झाले , फोन ची जागा sms ने घेतली आणि sms ची जागा e -mail, पुढे पुढे तर ते हि बंद झाले. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी होऊ लागली पण पावसाच्या सरीची चाहूलही लागेनाशी झाली. मन्ना डे च्या ऐवजी मुकेश भेटीला येऊ लागला. मनातल्या गुजगोष्टींची जागा मनातले सल घेऊ लागले. कालांतराने ते सल हि सरले अन आठवणीच काय त्या उरल्या , ज्या अजूनही कधी गरम कढ तर कधी सुखद गारवा घेऊन भेटीला येतात. पण हो, त्यालाही जुन्या गर्भरेशमी पैठणीतील नाचर्या मोरांची वेलबुट्टी आहे आणि त्यांना मी अजूनही अलगद मोरपिसागत जपून ठेवले आहे.....

मंद सुवासिक अत्तराच्या कुपीतील अत्तर तर उडून गेले आहे, पण ती रिकामी अत्तराची कुपी मी घट्ट बंद करून अजूनही शिसवी कपाटाच्या कुलूपबंद खणात जपून ठेवली आहे . जेंव्हा कधी फार उदास एकटे एकाकी वाटते तेंव्हा मी हळूच कुणी आजूबाजूला नाहीये हे बघून ती अत्तराची कुपी उघडते . उरलेला हलका हलका मंद सुगंध श्वासभरून घेते आणि चटकन बंद करते वर्षानुवर्ष तो असाच जतन करण्यासाठी आणि पुरवून पुरवून वापरण्यासाठी :)

शिल्पा   

Friday, November 20, 2015

मित्र

मित्र

माझा मित्र फक्त मीच बनावे

मनातले सगळे सल सांगायला
आणि ते अगदी तसेच्या तसे समजून घ्यायला
कायम मला अभिप्रेत असलेलाच अर्थ लावायला

नवीन तीरपांगडे विचार जोजवायाला 
कधीच मी चुकतोय असे न सांगायला
आणि प्रत्येकच गोष्टीवर गुमान मान डोलवायला

माझे तिरकस अतिरेकी तोडगे सरळपणे मानायला
माझ्याशी मनमुराद गप्पा मारायला 
आणि माझ्याच कानांनी माझे बोलणे ऐकायला !!


Tuesday, November 17, 2015

बहर

आपण कितीही आपले weather बरोबर घेऊन फिरलो तरी ते सोनेरी, चंदेरी दिवस त्या त्या गोष्टींची परत परत आठवण करून देतातच…दोन वर्षापूर्वी याच दिवसांत... तीच पानगळ , तोच पिवळेधमक सडा आणि तीच कविता !!

सोनेरी किरणांची झालर लेवून
तू माझ्या खिडकीतून डोकावत होतास
कोजागिरीच्या चांदण्यात
मला नाहून टाकत होतास

घट्ट मिटत्या काळोखात
छटा माझ्या आजमावत होतास
तुझे चित्र साकारण्यात
दिवस माझा सरत होता

रोज निराळ्या पिवळ्या रंगाचा
रंग मला उमगत होता
तरीही माझ्या पटावर तू
काही केल्या उमटत नव्हतास

कारण…. बहुदा…
शरदातील त्या पानगळीचा
मला कधीच अडसर नव्हता
माझ्या दारच्या पळसाला
सतत तोच बहर होता…

शिल्पा